लातूर

Latur Crime : लक्कडजवळगा रस्त्यावरील वाळूसाठ्यावर महसूल पथकाची धाड

माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून कारवाई?

पुढारी वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ : शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्कडजवळगा रस्त्यालगतच्या एका मोठ्या वाळूसाठ्यावर उपविभागीय अधिकारी मंजुशा लटपटे व तहसीलदार उज्वला पांगरकर (अहमदपूर) यांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा जप्त करून पंचनामा करण्यात आला. मात्र, या धाडीदरम्यान शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयातील एकही स्थानिक कर्मचारी उपस्थित नसल्याने या कारवाईबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

कारवाईच्या वेळी महसूल अधिकाऱ्यांसोबत खबरदारी म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत भंडे यांनी सांगितले की, “आम्ही केवळ महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उपस्थित होतो. कारवाईची अधिक माहिती तहसीलदारांकडून घ्यावी.”

स्थानिक तलाठ्याला नोटीस देण्याचे निर्देश

धाडीनंतर उपविभागीय अधिकारी लटपटे यांनी थेट शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालय गाठले आणि सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी "ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे," असे उपस्थित कर्मचाऱ्यांना बजावल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक तलाठ्याबाबत विचारणा केली असता ते एका अंत्यविधीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रती उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित तलाठ्याला नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.

माहिती देण्यास टाळाटाळ

या वाळूसाठ्याचे नेमके प्रमाण किती आणि पुढील कारवाई काय होणार, याबाबत पत्रकार व स्थानिक कार्यकर्त्यांनी विचारणा केली. मात्र, उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही वेळानंतर तपासणी पथक तेथून रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT