शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रापका येथील रहिवासी ज्ञानेश्वर श्रीपती चिंचोलकर यांचा मृतदेह आज (दि.13 जानेवारी) सकाळी त्यांच्या राहत्या घरी आढळला. घरातील पायऱ्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या लोखंडी कोंडीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर चिंचोलकर यांच्यावर काही काळापूर्वी शेतीच्या वाटणीच्या वादातून त्यांच्या मुलीने पोस्को कायद्याअंतर्गत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात आई व बहिणीला जमीन वाटप करून गावातील पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने तडजोड होण्याची शक्यता होती. मात्र, जमीन वाटपावरून मतभेद कायम राहिल्याने तडजोड न झाल्याने अखेर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात चालला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर चिंचोलकर यांची लातूर येथील साई जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
आज (दि.१३ जानेवारी) सकाळी त्यांच्या घरातील पायऱ्यांच्या वरच्या बाजूला लोखंडी कोंडीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की अन्य काही कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे रापका गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.