Latur Crime News: Revenue Department Recovers Fine of ₹2.53 Lakhs from Windmill Company
निलंगा : पुढारी वृत्तसेवा :
पवनचक्कीच्या कामासाठी केळगाव येथील एका शेतकऱ्याच्या मालकी हक्कातील गौण खनिज अवैधरीत्या उपसा केल्याप्रकरणी महसूल विभागाने पवनचक्की कंपनीकडून २ लाख ५३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील केळगाव व राठोडा, उमरगा (हा), लांबोटा, दापका परीसरातील शेतकऱ्यांना मोठ्या पैशाचे आमिष दाखवून दलालांची टोळी उभारुन पवनचक्की उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या भागात जवळपास दहा ते बारा पवनचक्की उभारण्याच्या परवानगी घेण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यातील चार पवनचक्कीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.
राठोडा शिवारात पवनचक्कीच्या कामासाठी केळगाव येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या डोंगर पायथ्याची जेसीबीने उत्खनन करुन मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपसा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाईचा बडगा उगारत तलाठी व मंडळाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल मागतत तब्बल २ लाख ५३ हजाराचा दंड वसूल केला आहे.
एका पवनचक्की कामाचे पितळ उघडे पडले म्हणून प्रशासनाने संबंधितांकडून दंड भरुन घेतला. आणखीन चार पवनचक्कीचे काम पूर्ण झाले असून पाच ते सहा ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. त्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या गौणखनिज उपसा बाबत महसूल विभाग दंड वसूल करणार का? नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.