जळकोट : पोलीस ठाणे जळकोटच्या हद्दीत शासकीय परवान्याशिवाय अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा टिपरवर जळकोट पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 50 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गु. र. नं. 133/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7), 48 (8) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 14 मे रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास घोनसी (ता. जळकोट ) येथील सर्व्हिस रोडलगत करण्यात आली. पोलिसांनी दोन हायवा टिपरमधून अंदाजे 10 ब्रास वाळू जप्त केली. प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे वाळूची किंमत 50 हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन टाटा सिग्मा कंपनीचे हायवा टिपर (MH 26 CH 8880 व MH 26 CV 2876) प्रत्येकी अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी आरोपी गणेश शंकर पवार (वय 31, रा. धावरी तांडा, ता. लोहा, जि. नांदेड), तिरुमला दिगंबर डिकळे (वय 27, रा. पार्डी ता. लोहा. जि. नांदेड), शिवाजी व्यंकटी आलट (वय 47, रा. हारसद, ता. लोहा, जि. नांदेड) आणि आबा रंगानाथ ढेबरे (रा. बेरळी, ता. लोहा, जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस हवालदार मुजमिल युसुफसाब कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड हे करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी संगनमत करून शासनाचा महसूल बुडवत विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक केली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
शासनाचा महसूल बुडवत जळकोट तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. या तालुक्यात संबंधित विभाग अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी म्हणावे तितके सतर्क नसल्याने शेजारच्या जिल्ह्यातील वाळू माफिया इकडे येऊन धुमाकूळ घालत आहेत. यापूर्वीही ब-याचदा अवैध वाळू वाहतूकीविरुद्ध तालुक्यात कारवाई झाली असली तरी चोरटी वाळू वाहतूक अद्याप थांबलेली नाही, हे या कारवाईने सिद्ध झाले आहे. वाळूचे ओव्हरलोड टिपर तालुक्यातून धावत असले तरी आरटीओचे अधिकारीही काहीच कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आरटीओचे अधिकारी हे ठरवून काही जणांवर कारवाई करतात पण वाळूच्या टिपरकडे मात्र दुर्लक्ष करतात अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांची ही कारवाई 'मी करतो मारल्यासारखे तू कर रडल्यासारखे' या प्रकारातील ठरु नये' अशी अपेक्षा जागरूक नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे.