चाकूर : तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी (दि.२६) मध्यरात्री एका हॉटेल मालकाची काठीने डोक्यात प्रहार करून हत्या करण्यात आली. 'बी.एन. बार अँड रेस्टॉरंट'चे मालक गजानन नामदेव कासले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून, अज्ञात आरोपींनी बारमधील रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या घेऊन पलायन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास 3 अज्ञात तरुण नायगाव येथील 'बी.एन. बार'मध्ये आले. त्यांनी हॉटेल मालक गजानन कासले यांच्याकडे दारू आणि सिगारेटची मागणी केली. मालकाने नकार दिला असता, आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी कासले यांच्या डोक्यात काठीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गजानन कासले यांचा जागीच मृत्यू झाला.
केवळ हत्या करूनच हे आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी हॉटेलमधील अजय भरत मोरे यांनाही काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. बारमधील टीव्हीचीही त्यांनी तोडफोड केली. कॅश काउंटरमधील अंदाजे १५ हजार रुपये आणि विदेशी दारूच्या बाटल्याही त्यांनी चोरून नेल्या.
घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्याआधारे पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नायगाव आणि चाकूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत गजानन कासले यांचे भाऊ बालाजी कासले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.