लातूर : लातूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गंभीर प्रकरणात लातूर पोलिसांनी अतिशय जलद, काटेकोर आणि संवेदी पद्धतीने कारवाई करत आरोपीस अटक केली. विशेष म्हणजे, गुन्हा नोंद झाल्यानंतर केवळ २० तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल केले आहे.
तक्रारीनुसार १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास इसराईल कलीम पठाण (वय २७, रा. गौसपुरा, लातूर) हा फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे घुसला आणि अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केला.
यापूर्वीही आरोपीने मुलीचा वारंवार पाठलाग करणे, तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे पीडितेच्या कुटुंबावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ३३३, ३५१(२) (३) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ व १२ नुसार नोंदविण्यात आला. गुन्हा नोंद होताच पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या सूचनांनुसार अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण व
उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केली. गुप्त माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे आरोपी इसराईल पठाण यास ताब्यात घेण्यात आले आणि कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तपास अधिकारी पोउपनि गणेश चित्ते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध केवळ २० तासांत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या कारवाईत महिला व पुरुष पोलिस कर्मचारींचा सक्रिय सहभाग राहिला. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, छेडछाड किंवा संशयास्पद हालचाली तातडीने पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन लातूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.