चाकूर : तालुक्यातील शिवणखेड येथे साधारणत एक ते दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना गुरूवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता उघड झाली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेबद्दल तर्क वितर्क काढले जात आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील एका पानटपरी खाली साधारणत: एक ते दोन दिवस वयाचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत कोणीतरी अज्ञाताने टाकल्याचे दिसून आले.
घटनास्थळी पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला व अर्भकाचे शवविच्छेदन जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. शिवणखेड येथे ग्रामपंचायतीकडून अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत तंटामुक्त गाव समीतीचे अध्यक्ष निवृत्ती गोविंद येचाळे यांनी पोलीसात तक्रार दिल्यावरुन पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.