Chakur Panchayat Samiti Pudhari
लातूर

Latur MNREGA Scam | कलकोटी, बावलगाव मनरेगा कामातील अपहारप्रकरणी ४७ लाख रुपये भरण्याची नोटीस

३० दिवसांत रक्कम व्याजासह जमा करण्याचे आदेश; अन्यथा फौजदारी गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : तालुक्यातील कलकोटी आणि बावलगाव ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांच्या गोठा आणि शेततळे कामात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा तत्कालीन सरपंचांवर व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर ठपका ठेवून अपहृत रक्कम व्याजासह शासन खात्यात जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ही नोटीस दिली आहे. त्यांनी दिलेल्या नोटिशीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अहवालातील निष्कर्षानुसार कलकोटी येथील गाय गोठा आणि बावलगाव येथील शेततळ्याच्या कामामध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाला आहे,असा अभिप्राय नोंदविला आहे. त्यानुसार कलकोटीचे तत्कालीन सरपंच, बावलगावचे सरपंच, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामरोजगार सेवक,पालक तांत्रिक अधिकारी,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून अपहृत रक्कम व्याजासह वसूल करून शासन खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्या ३१ ऑगस्ट २०२६ च्या आदेशाने कलकोटी येथील गोठा कामामध्ये अनियमितता व गैरव्यवहाराची एकूण ३२ लाख ३३ हजार ३७० रुपयांची रक्कम आणि बावलगाव येथील शेततळे कामामध्ये १५ लाख ५२ हजार ६९७ निश्चित केल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन कलकोटीचे सरपंच यांच्यावर २ लाख ३० हजार ९८० रुपयांची व बावलगाव येथील सरपंच, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांना ३ लाख १० हजार ५३५ रक्कमेची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

नोटीस मिळाल्यापासून त्यांनी ३० दिवसांच्या आत ही रक्कम प्रचलित नियमानुसार व्याजासह पंचायत समिती कार्यालयात जमा करावी, अन्यथा शासकीय कामात गैरव्यवहार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची व वेतनातून वसुलीची कार्यवाही केली जाईल, असे नोटीसीत म्हटले आहे. कलकोटी आणि बावलगाव मनरेगा कामातील अपहारप्रकरणी ४७ लाख रुपये भरण्याची नोटीस निघताच अनेक गावातील सरपंच अधिकारी यांचे चांगलेच दाबे दणाणल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT