लातूर

Latur Crime : लातूर हादरले! भाजप पदाधिकारी मुंगे यांची निर्घृण हत्या; जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार, ७ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथील शेतशिवारात ३५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१८ ऑगस्ट) उघडकीस आली. मयत युवक हा भाजप युवा मोर्चाचा अहमदपूर तालुका उपाध्यक्ष होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजोटी येथील रहिवासी गोविंद सोपानराव मुंगे (वय ३५) यांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा गमावल्याने आईने फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. मंगळवारी सकाळी १०:३० ते सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास हा खून झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मयताची आई कमलबाई सोपानराव मुंगे (वय ६८, रा. गुंजोटी) यांनी किनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या जमिनीच्या वादातून बेकायदेशीर मंडळी जमवून संशयितांनी गोविंद मुंगे यांच्या हाता-पायांवर धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्यांना जागीच ठार मारले. या तक्रारीवरून गुंजोटी येथील ७ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक (API) संकेत दिघे करत आहेत.

दरम्यान, किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) केल्यानंतर बुधवारी सायंकाळी गुंजोटी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी किनगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली व निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक बावकर, सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक वल्लमपल्ले आणि तोंडारे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT