उदगीर : अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सचिन कसबे यास १० वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्री. डी.बी. म्हालटकर यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी हा निकाल दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०१ जुलै २०१७ रोजी पीडित अल्पवयीन तरुणीला आरोपी सचिन कसबे याच्या बायकोने जबरदस्तीने पळवून नेले आणि लातूर येथील घरी ठेवले. त्याच रात्री १२ वाजता आरोपी सचिन कसबे याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेने उदगीर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. एम.एस. ठाकूर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आरोपीने जिल्हा न्यायालयात आपल्यावरील दोष नाकारल्याने खटला चालवण्यात आला. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांच्या जबाब, वैद्यकीय अहवाल व इतर कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने निकाल दिला. सहा. सरकारी वकील शिवकुमार एम. गिरवलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला.
कोर्ट पैरवी अधिकारी अनिल धोंडके यांनी सहकार्य केले. न्यायालयाने आरोपी सचिन कसबे यास भारतीय दंड संहिता कलम ३७६(१) अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यासाठी १० वर्षे सश्रम कारावास व १०,००० रु. दंड, दंड न भरल्यास ६ महिने अधिक कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत. सहा. सरकारी वकील अॅड. एम.एम. गिरवलकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले,