उदगीर : दुचाकीला वाचविताना कंटेनरची कारला समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघा माजी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. विठ्ठल बाबुराव याचेवाड (वय ६२, रा.अकरवाई, हरंगुळ ता.लातूर), यादव तुळसीराम काळे (वय ५८), बब्रुवान मारोती मेखले (वय ६१, दोघेही रा.सुगाव ता.चाकूर) अशी मृतांची नावे आहेत. तर यामध्ये माजी सैनिक हुजूर घुडूसाब पठाण (वय ६० वर्षे, रा.सुगाव ता.चाकूर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.२३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक असलेले चार मित्र बिदर येथील सैनिकी कँटीन येथून लातूर जिल्ह्यातील सुगाव (ता.चाकूर) या आपल्या मुळ कारने (क्र. एम.एच.२४ व्ही ०१६३) येत होते. यादरम्यान लातूरकडून कंटेनर येत असताना अडव्या आलेल्या दुचाकीला वाचविताना कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या कारला कंटेनरची जोराची धडक बसली. या अपघातात तिघा माजी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. तिघांचा मृतदेह हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून जखमीवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.