जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना पाहणी दौरा केला  Pudhari
लातूर

Latur News | चाकूरच्या पाणीटंचाईवर प्रशासन ॲक्शन मोडवर; अवैध पाणी उपशावर कारवाईचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी विविध भागांचा पाहणी दौरा करून पाणीटंचाईसह शेतीस्थितीचा आढावा घेतला

पुढारी वृत्तसेवा

Chakur Water Crisis

चाकूर : तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी विविध भागांचा पाहणी दौरा करून पाणीटंचाईसह शेतीस्थितीचा आढावा घेतला. वडवळ येथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नागरिकांना तातडीने आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी वडवळ परिसरातील पाणीटंचाईची तसेच शेतीची पाहणी केली. त्यानंतर शिवनी मजरा येथील जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या वॉटर प्युरीफिकेशन प्लांटलाही भेट देऊन त्याची पाहणी केली.

यानंतर तहसील कार्यालयात तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच जनावरांसाठी पुरेसे पाणी व चारा उपलब्ध करून देणे, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करणे आणि जलसंधारणाची कामे वेगाने हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

तालुक्यातील अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांमध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष माने, कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव यांच्यासह विविध विभागांचे कार्यालयप्रमुख, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT