Unseasonal rain in Latur
चाकूर : अवकाळी पावसाने चाकूरला चांगलेच झोडपले असून शहरातील उजळंब रोडवरील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धांदल उडालेली पाहायला मिळाली. या पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास झालेल्या पावसाने तासभर झोडपले आहे. या पावसाने चाकूर शहरातील उजळंब रोडवरील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व चाकूर व परिसरात अनेक गावात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान वीज गेल्याने आणि रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील काही गावातील अनेक आंब्यांचे नुकसान झाले आहे.
चाकूर शहरात पावसाने एक तास हजेरी लावल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी उजळंब रोडवरील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील पाणी उपसण्याची वेळ आली. तर काहींना घरातील पाणी बाहेर काढून देण्याची वेळ आल्याने लहान बालके आणि महिलांना नाहक त्रास सोसावा लागला आहे.
चाकुरातील लक्ष्मी नगर,बौध्द नगर, सुतार वाडा,पेट मोहल्ला या भागाला व तेथील परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. नाल्या तुडुंब भरून वाहल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात शिरले. या साचलेल्या पाण्याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. नागरिकांना पाण्यातून चाचपडत रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी जास्त आहे. या भागात पाणी अधिक साचल्याने याचा फटका नागरिकांना बसला आहे. शेतकरी नागरिक आणि महिलांना या पाण्यामुळे घराकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून नागरिकांनी पाण्यातून जावे कसे असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नी स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष घालून भविष्यात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे.
नवीन नालीचे बांधकाम पावसाने कोसळले असून या नालीच्या बांधकामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भविष्यात ही नाली टिकेल किंवा नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या कामाकडे लक्ष देवून नालीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या नालीच्या बांधकामाचा दर्जा हा पावसामुळे समोर आला असून संपूर्ण गावाचे पाणी या नालीमधून वाहते. त्यामुळे पावसाळ्यात ही नाली टिकणार नाही.सौरव गायकवाड, नागरिक