Chakur Hunger Strike
चाकूर : तालुक्यातील कलकोटी ग्रामपंचायतीतील मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कामांतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी २९ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. दरम्यान गुरुवारी चौकशी अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देताच एका उपोषणकर्त्याने आत्महत्या करतो म्हणून स्टेजवरून उडी मारल्याचा प्रकार घडला आहे.
तालुक्यातील कलकोटी येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सन २०२३ ते २०२५ या कार्यकाळात मनरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना सिंचन विहीर, गायगोठे, शेततळे, शेतरस्ते, बांबू लागवड, घरकुल, शोषखड्डे, इ. कामे न करता, बाहेरगावचे मजूर दाखवून बोगस बिले सादर करून शासनाच्या लाखो रूपयांच्या निधीची लूट केली आहे. सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल करून लाभार्थ्यांचे परस्पर खोटे मागणी अर्ज व ग्रामपंचायतचे खोटे ठराव घेवून कोणतेही काम न करता शासकीय निधीची अफरातफर केली असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते.
त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लातूर गटविकास अधिकारी यांना २६ सप्टेंबर रोजी पत्र काढून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे सांगितले. या कामी चौकशी अधिकारी श्याम गोडभरले यांनी २८ ऑक्टोबररोजी चौकशीसाठी येऊन गेले होते. ते ग्रामस्थांनी मान्य न करता उपोषण सुरु केले. गुरुवारी चौकशी अधिकारी श्याम गोडभरले पंचायत समिती उपोषणस्थळी भेट देताच दोषीवर कार्यवाही करा मला न्याय द्या. म्हणून दीपक मछिंद्र मुरके (वय ४८) यांनी स्टेजवरून समोरच्या लोखंडी गजाला उडी घेवून लोंबकळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे. यामुळे कलकोटी ग्रामस्थांना आतातरी न्याय मिळेल का? असा सवाल नागरिकांना पडला आहे. दरम्यान चौकशी अधिकारी श्याम गोडभरले यांनी तत्काळ विस्तार अधिकारी यांना सांगून चौकशी पारदर्शक करून लवकरात लवकर अहवाल देण्याचे आश्वासन दिले.