लातूर

Chakur Panchayat Samiti news| चाकूर पंचायत समिती सभापतीसाठी हाके, नागरगोजे, केदार चर्चेत...

सभापतीपद ओबीसी महिलेसाठी राखीव, संधी कोणाला ?

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक हाती सत्ता मिळवली आहे. सभापतीपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून सुप्रिया हाके प्रबळ दावेदार असल्या तरीही जयश्री नागरगोजे आणि सावित्रीबाई केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान संधी नेमकी कोणाला मिळणार हे लवकरच समजणार आहे. सभापती पदासाठी अनेकांनी लॉबीग लावल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात मोठ्याने सुरु आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घवघवीत यश प्राप्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रोहिणा गणातून जयश्री नागरगोजे, जानवळ गणातून सावित्रीबाई केदार ह्या मोठे दावेदार मानल्या जात आहेत. अजनसोंडा ओबीसी महिला प्रवर्ग असलेल्या गणातून निवडणुकीत एकमेव विजयी झालेल्या सुप्रिया हाके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. सुप्रिया हाके यांचे पती डॉक्टर आहेत. ते राजकारणात नवखे असले तरी त्यांच्या पत्नी या पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.

सावित्रीबाई केदार ह्या जानवळ गणातून ओबीसी जागेवर निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत. त्यांनाही संधी मिळू शकते ? असे राजकीय गोठ्यात बोलले जात आहे. त्यांना केंद्रेवाडीच्या सरपंच पदाचा राजकीय अनुभव असला तरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. पती दगडू केदार रेणापूर राष्ट्रवादी शिक्षक संघांचे अध्यक्ष, मुलगा प्रतीक केदार हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक मानले जातात. अत्यंत विनम्र आणि पक्षातील सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांना संधी मिळेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यानी व्यक्त केला आहे.

जयश्री नागरगोजे यांना सभापतीपदी संधी मिळण्याची अधिक चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्या रोहिणा गणातून खुल्या जागेवर निवडून आल्या आहेत. या भागात त्यांचे पती मच्छिंद्र नागरगोजे यांचे वर्चस्व आहे. त्यांनी राजकारणात आपला प्रभाव कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचा चांगला ग्रामीण चेहरा अशी त्यांची ओळख असून आपल्या अनुभवाच्या जोरावर ते पंचायत समितीचे सभापतीपद उत्तमरित्या सांभाळू शकतात. त्यांच्या सभापतीपदामुळे राष्ट्रवादी पक्षाला राजकीय फायदा होऊ शकतो. अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

हाके, नागरगोजे आणि केदार तिन्ही बळकट उमेदवार रिंगणात असल्याने अखेर सभापतीपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० पैकी ०८ जागा जिंकून राष्ट्रवादीने पंचायत समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. परंतु सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सभापतीपदासाठी कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT