चाकूर : चाकूर शहरात एका व्यक्तीच्या घरामध्ये १ लाख ९१ हजारांचा साडेनऊ किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी साडेबारा वाजता जप्त केला असून पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी १२.५० वाजता चाकूर शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे एका व्यक्तीच्या राहत्या घरामध्ये स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत होता. याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी छापा मारून अनिल शिवाजी सूर्यवंशी (वय ४८) रा.अण्णाभाऊ साठे नगर यास ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता खाताच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये बी मिश्रित नऊ किलो ५६५ ग्राम गांजा ज्याची अंदाजे किंमत एक लाख ९१ हजार तीनशे रुपये मिळाला आहे. त्याची विचारपूस केली असता त्याने हा गांजा अवैध विक्रीसाठी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे रा. कृष्ठधाम, विवेकानंद चौक, लातूर याच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले,पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तानाजी बरुरे,सुधीर कोळसुरे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, रियाज सौदागर, प्रदीप चोपणे यांनी ही कामगिरी केली.