काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य बाजारपेठेत ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात आले.  Pudhari
लातूर

Chakur Congress Protest | चाकुरात शेतकरी-शेतमजुरांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे ‘भीक मागो आंदोलन’

सरकारविरोधात घोषणाबाजी; जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला

पुढारी वृत्तसेवा

Chakur Congress Bheek Mago Andolan

चाकूर : शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चाकूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. २९) मुख्य बाजारपेठेत ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात आले. शहराध्यक्ष पप्पूभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

आंदोलनादरम्यान पप्पूभाई शेख यांनी भिकाऱ्याचा पोशाख परिधान करून, पोत्याचा शर्ट घालत हातात कटोरा व सोयाबीनच्या पेंड्या घेऊन मस्जिद चौक ते जुने बसस्थानक परिसरातील बाजारपेठेत भीक मागितली. या माध्यमातून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आली.

यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, शेतमजुरांच्या कुटुंबांना ५० हजार रुपयांची मदत करावी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा तातडीने मंजूर करावा, चारा छावण्या सुरू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच शेतकरी कुटुंबांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

चाकूर शहरातील मजुरांसाठी रोजगार हमी योजना सुरू करण्याची मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. शेतकरी व शेतमजूर आर्थिक संकटाचा सामना करत असताना शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव एन. आर. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलासराव पाटील, अनिल चव्हाण, गंगाधर केराळे, सलीम तांबोळी, युसूफ शेख, संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने मुख्य बाजारपेठेत काही काळ वातावरण तापले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT