Ausa Koyta Attack Case
औसा : औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील हॉटेलजवळ तेजस गायकवाड याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या अक्षय ऊर्फ आकाश अप्पाराव नरवडे याला औसा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. याकतपूरपासून सारोळा, सेलू, कवा मार्गे पेठपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.
बुधवारी जुन्या बसस्थानकासमोरील एका हॉटेलजवळ हा हल्ल्याचा प्रकार घडला. अक्षय नरवडे याने तेजस गायकवाड याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमी तेजस गायकवाड आणि पवन जाधव हे मित्र आहेत. १५ ऑक्टोबर रोजी शहरात चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात पवनवर आरोप होता. तेजस हा पवनला मदत करत असल्याच्या कारणावरून अक्षय ऊर्फ आकाश नरवडे याच्या मनात राग होता. त्यातूनच त्याने तेजसवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. औसा पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार करून त्याचा शोध सुरू केला. आरोपी अक्षय नरवडे हा रात्रीच्या सुमारास याकतपूर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे पोहोचले; मात्र आरोपी तेथूनही पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी सारोळा, सेलू आणि कवा मार्गे पेठपर्यंत त्याचा पाठलाग केला. पेठ येथे तैनात असलेल्या दुसऱ्या पथकाने त्याला अडवून ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार फुलारी, सरवदे, घुले, पोलीस कॉन्स्टेबल महेश क्षीरसागर, योगेश भंडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.