अहमदपूर : अहमदपूर शहरात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या रखडलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्टच्या खड्ड्यात ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. महबूब बागवान (वय अंदाजे ३२ वर्षे, रा. अहमदपूर) असे मृत तरुणाचे नाव असून, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
१५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपूर्ण इमारतीतील लिफ्टच्या खड्ड्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम गेल्या काही काळापासून रखडलेले आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना अथवा धोकादायक भागाला बॅरिकेडिंग करण्यात आले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या घटनेला नेमके कोणते कारण कारणीभूत ठरले, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे.
महबूब बागवान यांचा मृत्यू अपघाती आहे की यामागे घातपाताचा संशय आहे, याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी पोलिसांकडून अद्याप कोणताही निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही. फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, रखडलेल्या बांधकामांच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासन व कंत्राटदाराची असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.