Ahmedpur Tehsil  Pudhari
लातूर

Latur Bribe | शेतकर्‍याकडून 1 हजाराची लाच; अहमदपूर तहसील कार्यालयातील महिला शिपाई 'एसीबी'च्या जाळ्यात

अध्याय प्रकरण कायमचे बंद करून देण्यासाठी दोन हजारांची मागणी, एक हजार स्वीकारताना रंगेहात अटक

पुढारी वृत्तसेवा

Ahmedpur Tehsil Female Peon ACB

अहमदपूर : अध्याय प्रकरण कायमचे बंद करून देण्यासाठी शेतकर्‍याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या अहमदपूर तहसील कार्यालयातील महिला शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडून अटक केली. मीरा रामदास काळगे असे अटक करण्यात आलेल्या महिला शिपायाचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १ सप्टेंबर) अहमदपूर तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली.

हाडोळती (ता. अहमदपूर) येथील ४३ वर्षीय शेतकर्‍याविरुद्ध त्यांच्या भावाच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध तहसील कार्यालयात अध्याय प्रकरण सुरू करण्यात आले होते. या प्रकरणाच्या पुढील तारखेबाबत माहिती घेण्यासाठी संबंधित शेतकरी १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात गेले होते.

त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला शिपाई मीरा काळगे यांनी, ‘तुम्ही दिलेल्या तारखेला गैरहजर राहत असल्याने तुम्हाला नोटीस मिळेल आणि तीन महिने तुरुंगात जावे लागू शकते,’ असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर ‘मी तुमची केस बंद करून देते,’ असे सांगून त्यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकर्‍याने एसीबीकडे केली.

या तक्रारीची एसीबीने १८ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यावेळी काळगे यांनी एक हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी अहमदपूर तहसील कार्यालय परिसरात एसीबीने सापळा रचला. अध्याय प्रकरणात पुढील तारीख न देणे तसेच प्रकरण बंद करून देण्यासाठी मागितलेली एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मीरा काळगे यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत माळी यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलिस निरीक्षक संजय केसरे, पोलिस शिपाई मंगेश कोंडरे, गजानन जाधव, शाहाजान पठाण आणि संतोष क्षिरसागर यांचा समावेश होता.

दरम्यान, कोणताही लोकसेवक शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अहमदपूर तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT