किनगाव (ता. अहमदपूर) : अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथे झालेल्या मोटरसायकल अपघातात सात वर्षीय मुलगी ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) संध्याकाळी घडली. या अपघातात कोमल प्रल्हाद केंद्रे (वय ७ वर्षे, रा. पाटोदा) ही बालिका गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोटरसायकलस्वार कृष्णा विनायक घोडके (रा. धानोरा, ता. अहमदपूर) यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत पाटोदा येथील राष्ट्रीय महामार्गावर कोमल हिला जोरदार धडक दिली. धडकेत ती गंभीर जखमी झाली होती.
या ठिकाणी यापूर्वीही पाच ते सहा अपघात झाल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी त्यांनी केली. पोलिस प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मयत बालिकेचे शवविच्छेदन किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी प्रल्हाद विठ्ठल केंद्रे यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलिसांनी आरोपी कृष्णा घोडके याच्याविरुद्ध निष्काळजी वाहनचालकतेचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास किनगाव पोलिसांकडून सुरू आहे.