Latur Accident 
लातूर

Latur Accident | चाकूर बायपासवर मृत्यूचा सापळा; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एकजण जखमी

रस्त्यावर रक्ताचा सडा; मन हेलावून टाकणारी घटना, प्रशासनाने आता तरी जागे व्हावे!

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : चाकूर बायपासवरील नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र रक्ताचे सडे पडले होते. विदारक दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेली माहिती अशी, अहमदपूरहून लातूरकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एमपी ०९ जीएच १०२०) भरधाव वेगाने येत असताना चाकूरकडून ( अलगरवाडी पाटी ) बायपासजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील जनार्धन काळबा येणगे वय ६० वर्षे व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येनगे वय ५५ रा.तेलगाव हे पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. मृत दाम्पत्य हे तेलगाव येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, या धडकेनंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने समोरून लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या वॅगनर एम एच २४ बी आर ७१२१ कारवर जोरदार धडकले . या अपघातात वॅगनरमधील श्रेयश सचिन वाघमारे वय १६ वर्षे रा.शिरूर ताजबंद याचा जागीच मृत्यू झाला असून त्या गाडीतील सुशील शिवमुर्ती स्वामी ४२ वर्षे रा. शिरूर ताजबंद हे गंभीर जखमी झाले आहेत. ते दोघेजण शिरूर ताजबंदचे रहिवासी आहेत.जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की काही क्षण परिसरात एकच आक्रोश पसरला. मदतीसाठी धावलेल्या नागरिकांचेही मन हेलावून गेले. रस्त्यावर पडलेले रक्ताचे डाग आणि वाहनांचा चक्काचूर झालेला अवस्थेतील अवशेष पाहून अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येत होती.

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी कितीजण ?

चाकूर बायपासवरील हा राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत चालला आहे. याच मार्गावर वारंवार भीषण अपघात होत असून अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.

स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी उड्डाणपूल, सेवा रस्ता, वेगमर्यादा नियंत्रण, इशारा फलक आणि कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थापनाची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रक्ताने माखलेले रस्ते आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंबे, आता तरी प्रशासनाने जागे होऊन चाकूर बायपासवरील अपघात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT