Latur 300 kg of single-use plastic seized
लातूर, पुढारी वृत्तसेवाः लातूर शहर महानगरपालिकेच्या एका पथकाने शनिवारी (दि. २२) गंजगोलाई परिसरातील एका गोडाऊन वर छापा टाकून अंदाजे ३०० किलो सिंगल युज प्लास्टिकचा साठा जप्त केला. संबंधितास ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
सिंगल युज प्लास्टिकच्या वापरास बंदी आहे. असे असतानाही काही लोक प्लास्टिकचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपायुक्त श्रीमती वसुधा फड, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, क्षेत्रीय अधिकारी रवी कांबळे यांच्या पथकाने छापा मारून ही कारवाई केली.
सिंगल यूज प्लास्टिक आरोग्यास हानिकारक आहे. अशा प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. याशिवाय मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हे प्लास्टिक गटारी मध्ये अडकून पाणी तुंबते. कचऱ्यातील प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तर त्यांच्या आरोग्यासाठी ते अपायकारक ठरते.
त्यामुळे या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. व्यावसायिक आणि नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये. यापुढे बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा वापर केल्याचे आढळले तर ते जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक प्रदीप गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.