लातूर ; पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी चारशे रुपयांची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शाळेच्या प्रयोगशाळा सहाय्यकाला मंगळवारी (दि 16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाळेतच रंगेहात पकडले. जयप्रकाश बालाजी बिराजदार (वय 45) असे त्याचे नाव असून उदगीर तालुक्यातील तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तो कार्यरत आहे. त्याच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार हा महिलेचा भाऊ असून त्याची बहीण 2012-13 यावर्षी उपरोक्त विद्यालयात शिक्षण घेत होती. लग्नानंतर ती मालेवाडी (जि. परभणी) येथे तिच्या सासरी राहत आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता अर्ज करण्यासाठी तिला टीसी हवी होती. त्यामुळे तिच्या भावाने तिच्यावतीने शाळेत टीसी मिळण्यासाठीचा 8 जुलै रोजी अर्ज केला होता. 12 जुलै रोजी त्याने टीसी बाबत बिराजदार यास विचारले असता, यासाठी त्याने 400 रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने या विरोधात लातूर एसीबीकडे तक्रार केली. 16 जुलै रोजी शाळेतील कार्यालयात सापळा लावला व लाचेची रक्कम स्वीकारताना कारकून जयप्रकाश बालाजी बिराजदार रंगेहात पकडला गेला.