अहमदपूर - तालुक्यातील शिंदगी, मोघा आणि किनी (कद) या तीन गावांच्या हद्दीतील सुमारे ३३ फूट रुंदीचा व सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा शिवरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंदिस्त झाला होता. परिणामी शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक, कृषी अवजारे व यंत्रसामग्रीची ने-आण तसेच पशुधन शेतात नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हा प्रश्न दैनिकपुढारीने लावून धरल्यानंतर अहमदपूर उपविभागीय कार्यालय व तहसील प्रशासनाने रस्ता अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
तीन गावांचा शिवरस्ता अतिक्रमणमुक्त करून त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी सन २०२२ पासून सातत्याने करत होते. यासाठी जिल्हाधिकारी व अहमदपूर तहसील कार्यालयात वेळोवेळी निवेदनेही देण्यात आली होती. या मागणीची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून पुढे सूत्रे हलली आणि तहसीलदार उच्च्चला पांगरकर यांनी प्रकरण गांभीर्यानहाताळले.
तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तानाजी भंडारे, तलाठी संदीप पुट्टेवाड आणि महसूल कर्मचारी शिवाजी भुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शिवरस्त्याचे अचूक मोजमाप केले. त्यानंतर महसूल विभागाच्या नियमांनुसार संबंधित शेतकऱ्यांच्या सहकार्याने शिवरस्त्यावरील अतिक्रमणहटविण्याची कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
या कार्यवाहीमुळे सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा शिवरस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शेतमालाची वाहतूक, शेतीची यंत्रसामग्री, कृषी अवजारे तसेच इतर शेतीविषयक कामे अधिक सुलभ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये आणि वर्षभर वाहतुकीसाठी हा रस्ता सक्षम राहावा, यासाठी शिवरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच या रस्त्याच्या मजबुतीकरणाची प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
वर्षा ठाकूर यांच्या टीमवर्कचे स्वागत
तत्कालीन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे व तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तानाजी भंडारे, तलाठी संदीप पुढेवाड आणि महसूल कर्मचारी शिवाजी भुरे यांनी प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करताना माणुसकीचाही दृष्टिकोन जपला. अचूक मोजमाप, शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण समन्वय आणि नियोजनबद्ध कार्यवाहीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न कोणताही वाद निर्माण न होता सामंजस्याने निकाली निघाला.