World Theatre Day 2025 | जागतिक रंगभूमी दिन : लातूर जिल्ह्यातील खरोळा या गावी सुमारे दीडशे वर्षापूर्वी श्री दत्त मंदिरात समाधीस्त असलेले सद्पुरुष श्री सदानंद स्वामी महाराज यांनी सुरु केलेली नाट्यपरंपरा व धार्मिक उत्सव आजही ग्रामस्थांकडून सुरू ठेवली आहे प्रथेप्रमाणे नाट्यसप्ताहाचा समारोप पुरणपोळी महाप्रसादाने होतो.
श्री सदानंद स्वामी महाराजांनी त्या काळी " राम रावन युद्ध " हे पहिले नाटक सादर केले होते. तीच परंपरा आजही अखंडीतपणे सुरुच आहे. सुरुवातीपासून नाटकात विविध भूमिका बजावणारे काही कलाकार आजही हयात आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन नवीन कलाकार ही परंपरा जपण्यासाठी पुढे येत आहेत.
खरोळा येथे श्री दत्त मंदिरात दरवर्षी मार्गशिर्ष शुद्ध चुतुर्दशीला गुलाल करून अवधुत जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने " श्री दत्त प्रासादिक नाट्यमंडळाच्या " वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच नाटक व सांस्कृतीक कार्यक्रमही सादर केले जातात.
सोशल मीडियाच्या धामधुमीतही अगदी श्रध्देने रंगमंचावरील सर्व परंपरांचे पालन करून नाटकांचे प्रयोग साजरे केले जातात. पुर्वी स्त्री पात्र पुरुष कलाकारच सादर करीत असत आजही तिच परंपरा कायम आहे. संगीत , रंगकाम व इतर सर्व कामे ग्रामस्थच श्रध्देने करतात.
पुर्वी नाटका व्यतिरिक्त करमनुकिचे इतर दुसरे साधन नव्हते , म्हणुनच खेड्या - पाड्यात नाटकांचे प्रयोग सादर होत असत. खरोळ्याचे नाटक म्हणजे पंचक्रोशील गावकऱ्यांना एक पर्वनीच असायची. नाटक पाहण्यासाठी बैलगाड्याने लोक येत असत. श्री दत्त प्रासादिक नाट्यमंडळाने आत्तापर्यंत सर्वधर्मसमभाव जपत महाराजांनी सुरु केलेली नाट्यपरंपरा तर जपलेली आहे.
आत्तापर्यंत सादरीकरण केलेल्या नाटकांमध्ये " राम रावण दुद्ध " हे पहिले नाटक फारच लोकप्रीय झाले होते. त्यानंतर राजा हरिश्चंद्र , पंताची सुन, वस्त्रहरण, स्वर्गावर स्वारी, एकच प्याला, पातीव्रत्याचा झेंडा, घराबाहेर , कलीचा संसार, सख्खे भाऊ पक्के वैरी, डाकु मानसिंग, मोरुची मावशी, कयाधू, असे झुंजले वीर मराठे, चिलीया बा, कशी ओवाळू मी भाऊराया, संगीत शारदा, मत्स्यगंधा" अशी अनेक सामाजिक, ऐतिहासिक व पौराणिक नाटके सादर करून ती प्रेक्षकांना भारावून गेली. नाटकाच्या प्रारंभी सादर होणारे नमन हे कै. ओमप्रकाश धमगुंडे सादर करीत असत, तर नाटकाची पंचपदी कै. कृष्णाचार्य आनंद गोसावी यांच्याकडे असायची.
ज्यावेळी " राम रावण युद्ध " हे नाटक सुरु होते त्यावेळी तेथे एक वानर बसले होते. रावणाचा वध न करताच नाटकाची सांगता झाली तरीही ते वानर तेथून हलले नाही त्यावेळी महाराजांना या प्रसंगाची जाणीव झाली आणि त्यांनी परत ते नाटक सुरु करुन रावण वधाने ते संपवले व वानर तेथुन निघून गेले, अशी अख्याईका सांगितली जाते.
तेव्हापासून मंदीरात हनुमानाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पुर्वीपासून हनुमानाच्या मुर्तीला रंग लावून व मुर्तीची पुजा करुनच नाटकातील कलाकारांना रंग लावला जात असे. आजही तीच परंपरा कायम राखली जाते. असे श्री दत्त मंदीर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
दीडशे वर्षाच्या कालावधीत विविध नाटकांमध्ये शेकडो कलाकारांनी सहभाग नोंदविला, त्यातील सर्वात वयोवृद्ध असलेले नव्वदी पार केलेले पुरुषोत्तम जोशी, पंचेऐंशी वर्षांचे विठ्ठलाचार्य आनंद गोस्वामी, किसनदेव जोशी, शिवदासप्पा मोतमफळे, अंकुश राऊतराव, केदारनाथ पिंपळे, किशोर कुलकर्णी, बब्रुवान आडतराव, राजेश्वर उकीरडे, अनंतराव देशमुख, वैजनाथ घोडके , कालीदास पाठक, माणिक शिंदे, जनार्दन जाधव, दत्तात्रय दहिवाले, ज्ञानोबा गोंदरकर हे कलाकार आजही हयात असून ते नाटकात विविध भूमिका बजावत असतात.
त्याकाळी या नाट्यउत्सवाची सांगता महाप्रसादाने होत असे. या उत्सवास येणाऱ्या लोकांना तूप व पुरणपोळीचे जेवण दिले जाई. त्यावेळी लोकसंख्या कमी होती त्या संख्येनुसार सव्वामन पुरणाच्या पोळ्या केल्या जात आणि तीच परंपरा आजही खरोळा गावकऱ्यांनी सुरू ठेवली आहे.