Latur JCB Accident | हगदळ येथील तळ्यात जेसीबी बुडाला; ऑपरेटर बेपत्ता  Pudhari Photo
लातूर

Latur JCB Accident | हगदळ येथील तळ्यात जेसीबी बुडाला; ऑपरेटर बेपत्ता

परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

अहमदपूर : तालुक्यातील हगदळ येथील तलावात एक जेसीबी मशीन बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१६) सायंकाळी घडली. विशेष म्हणजे, या घटनेनंतर जेसीबीचा ऑपरेटरही बेपत्ता असून, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसून, घटनेमागचे कारण गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हगदळ गावातील काही ग्रामस्थांनी तलावात एक जेसीबी मशीन अर्धवट बुडालेल्या अवस्थेत पाहिल्याची माहिती प्रशासनाला दिली. ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर जेसीबीमध्ये कोणीही नसल्याचे दिसून आले. यानंतर तातडीने पोलिस व स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने जेसीबी बाहेर काढण्याचा आणि ऑपरेटरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार पडल्यामुळे शोध मोहीम स्थगित करण्यात आली.

बुधवारी १७ जुलै सकाळी बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले. जेसीबी मशीन तलावाबाहेर काढण्यात यश आले असले तरी ऑपरेटरचा अद्याप काहीही थांगपत्ता लागलेला नाही. ऑपरेटर नेमका तलावात बुडाला की तो आधीच जेसीबीमधून खाली उतरला होता, याबाबत सध्या तरी कुठलीही स्पष्टता नाही. दरम्यान, या घटनेमुळे गावात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ऑपरेटरच्या बेपत्तामुळे घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताची शक्यताही पोलिस नाकारलेली नाही. अहमदपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व बचाव पथकाकडून ऑपरेटरचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ऑपरेटरच्या बेपत्ताची नोंद ऑपरेटर संजय पिराजी पवार (वय ४२, रा. इंदिरा नगर, अहमदपूर) याच्या बेपत्ताबाबत पत्नी छाया संजय पवार (वय ३५) यांनी १५ जुलै रोजी अहमदपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला आहे. सदरील घटनेची माहिती कळताच अहमदपूर शहरासह हगदळ गावातील ग्रामस्थांनी तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मात्र नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT