Sanjay Rathod : जलसंधारणाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही pudhari photo
लातूर

Sanjay Rathod : जलसंधारणाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही

जलसंधारण मंत्री संजय राठोड : औसा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

लातूर : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरण्यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. त्यांनी आज औसा तालुक्यातील फत्तेपूर, दावतपूर, तांबरवाडी, राजेवाडी येथील जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.

आमदार अभिमन्यू पवार, माजी आ. दिनकर माने, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, सभापती गंगाबाई कोदळीकर, सभापती चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सात गावांची निवड करून या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या संकल्पनेतून जलसमृद्ध औसा अभियान राबविण्यात येत आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमामुळे निर्माण होणारा जलसाठा आणि भूजल पुनर्भरणामुळे भूजल पातळीत वाढ होईल. त्याचा आगामी काळात शेतकऱ्यांना फायद होईल.

या गावांमध्ये नवीन बंधारा, बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरण यासारख्या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गावात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे होणे आवश्यक असून यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राठोड यांनी केले.

जलसमृद्ध औसा अभियान अंतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येत आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून पहिल्या टप्प्यात तालक्यातील तांबरवाडी,दा वतपुर, महादेववाडी, फत्तेपुर, पारदेवाडी, कवळी (हि.) आणि हिप्परगा(क.) या सात गावांची निवड करण्यात आली आहे.

राज्य शासन, टाटा मोटर्स फाउंडेशन, नाम फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मार्फत या गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरु असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील टप्प्यात औसा तालुक्यातील सर्वच गावांचा समावेश या गावांमध्ये केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खोलीकरण कामाचे उद्घाटन

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे 7 किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे 6 किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पाणी केली. तसेच दावतपूर येथे अभिसरणातून उभारण्यात आलेली अंगणवाडी इमारत, कांदाचाळ, जनावरांचा गोठा यासह विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच याठिकाणी नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. येथील अमृत तलाव संवर्धन कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थांशीही संवाद साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT