In Ahmedpur, a wife murdered her husband due to a family dispute.
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : शिरूर ताजबंद ता.अहमदपूर येथील एका 36 वर्षीय तरुणाचा त्याच्याच पत्नीने डोके भिंतीवर आपटून व गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत प्रकाश गायकवाड असे मृताचे नाव असून अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नीचा प्रताप अहमदपूर पोलिसांनी खाक्या दाखवून उघडकीस आणला आहे.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत प्रशांत आणि त्यांची पत्नी अर्चना यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून अर्चना दीड वर्षे माहेरी राहिली होती आणि काही महिन्यांपूर्वीच ती पुन्हा नांदायला आली होती. बुधवार दि.17 डिसेंबर रोजी सायंकाळी अर्चनाने पती बेशुद्ध पडला आहे असा बनाव करून दीर प्रवीण गायकवाड याला घरी बोलावले. प्रशांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुरुवातीला अर्चनाने पती दारू पिऊन मारहाण करत असताना झालेल्या ढकलाढकलीत त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला पण प्रशांतच्या शरीरावरील जखमा आणि गळ्यावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला तसेच शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
पोलिसाांनी मयताची पत्नी अर्चना हीची कसून चौकशी केली असता सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देेणाऱ्या अर्चनाने पोलीस खाक्या दाखवताच गुुन्हा कबूल करून मागील भांडणाची कुरापत काढून अर्चनाने दारूच्या नशेत असलेल्या प्रशांतचे डोके भिंतीवर आपटले व गळा आवळून खून केल्याचे कबूल केले आहे.