चाकूर : संग्राम वाघमारे
तालुक्यातील भाटसांगवी येथील पती- पत्नी दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेले होते. यावेळी तलावात पाय घसरून पती बालाजी कोंडीबा वाघमारे (वय ५३ वर्षे) यांचा आज (मंगळवार) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे (वय ४५ वर्षे) यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या बचावल्या.
घटनास्थळी आरोग्य विभागाची रुग्णवाहिका आणि अहमदपूर नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल झाले आहे. बालाजी कोंडीबा वाघमारे यांची तलावात शोधमोहीम युद्धपातळीवर सुरु आहे, अद्याप त्या यंत्रनेला यश आलेले नाही.
या विषयी अधिक माहिती अशी की, चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील रहिवाशी बालाजी कोंडीबा वाघमारे आणि त्यांच्या पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे हे गावातील पाझर तलावावर दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेले होते. त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. तलावावर दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेल्यावर दोघांनीही धुणे आटोपून शेवटचे चवाळे धुऊन पसरविण्यात मग्न असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पती बालाजी कोंडीबा वाघमारे हे खोल पाण्यात पाय घसरून पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. हे पाहून पत्नी गयाबाई वाघमारे यांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे शेतकरी धावत येऊन त्यांच्या साडीला पकडून ओढल्याने तीचे नशीब चांगले म्हणून त्या पाण्यात बुडण्याआधीच त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच चाकूर येथून रुग्णवाहिका आणि अहमदपूर नगर परिषदेची अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. बालाजी वाघमारे यांचा तलावात शोध घेतला जात आहे. अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. शोधमोहीम सुरु आहे.
बालाजी वाघमारे यांच्या मृत्यूने भाटसांगवी व चाकूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बालाजी वाघमारे हे शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करीत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून कर्ता पुरुष डोळ्यासमोर पाण्यात बुडाल्याने पत्नीने यावेळी टाहो फोडला.