Latur Ghrani dam overfull
शिरूर अनंतपाळ: तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसांडून वाहत असून परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर इतका आहे की घरणी मध्यम प्रकल्प भरला असुन सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
घरणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी प्रकल्प जलशय्येपर्यंत भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, मात्र नदीकाठी व नाल्यांच्या बाजूने राहणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लक्कडजवळगा , हानमंतवाडी, धामणगाव, कारेवाडी , नागेवाडी, समतानगर, पांढरवाडी, गावचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून, प्रशासनाने नागरिकांनी गरजेखेरीज घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, तसेच लहान मुलांना पाण्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात पावसाचा जोर कायम असुन घरणी, मांजरा नदीओव्हरफ्लो वहात असुन अनेक रस्ते पाण्याखाली गेले असुन नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला असुन सुरक्षित ठिकाणी रहावे असे आवाहन पुढारीशी संपर्क करुन तहसिलदार लालासाहेब कांबळे यांनी केले आहे.