लातूर, पुढारी वृतसेवा : बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरू असून 60 पैकी 30 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नदीला आलेल्या पुराने तब्बल 49 रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांतील पिके पाण्याखाली गेली असून हाता तोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेत प्रशासनास योग्य ते निर्देश दिले आहेत.एकाच दिवसात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी मांजरा, तावरजा, निम्न तेरणा धरणांची काही दारे उचलून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मांजरा 99.21, निम्न तेरणा 96.93 टक्के भरले आहे. याशिवाय जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतही चांगला जलसाठा झाला आहे.
नदयांना पूर आल्याने नदीकाठची शेते पाण्यात गेली आहेत. माती वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात आज सरासरी 62.8 मि.मी. पाऊस झाला आहे. त्याचे तालुकानिहाय चित्र लातूर 60मि.मी., औसा 57.3, अहदमपूर 62.9, निलंगा 50.उदगीर 86.9, चाकूर 51.7, रेणापूर 64.9, देवणी 59.2, शिरूर अनंतपाळ 72.7, जळकोट 77.9 मि.मी. असे होते. उदगीर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
औसा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आ. अभिमन्यू पवार यांनी गुरुवारी औसा येथे प्रशासकीय बैठक घेऊन या परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही आ. पवार यांनी सांगितले.
लातूर (66), हरंगुळ (78.5), कासार खेडा (69.8), कन्हेरी (78.5), लामजना (72.5), किनी (102.8), किल्लारी (72.5), अहमदपूर (68.3), खंडाळी (68.3), शिरूर ताजबंद (71.5), हाडोळती (71.5), पानचिंचोली (67.00), निटूर (66. 00), मदनसुरी (68.8), उदगीर (85.8), नागलगाव (89.00), वाढवणा (84.00), नळगीर (76.5), मोघा (110.8), हेर (81.5), देवर्जन (81.05), तोंडार (85.8), साकोळ (70.3), उजेड (90.5), जळकोट (79.3) घोणसी (76.5), रेणापूर (76.00),पानगाव (71.00), शिरुरअनंतपाळ (70.3), हिसामाबाद (90.05),