Guardian Minister Bhosale inspected the areas affected by heavy rains
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रेणापूर तालुक्यातील हरवाडी आणि लातूर तालुक्यातील महापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच यावेळी शेतकरी, ग्रामस्थांकडून नुकसानीची माहिती घेतली.
हरवाडी येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल कुमार मीना, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रशांत थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एम. थोरात, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, गट विकास अधिकारी सुमित जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तर महापूर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले यांची उपस्थिती होती.
हरवाडी येथे पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच येथील शेतकऱ्यांना नदी ओलांडून शेतामध्ये जाण्याकरिता नाबार्डच्या योजन-'तून पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. तसेच गावातील जलजीवन मिशन योजनेतील विहिरीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. महापूर येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची, तसेच मांजरा नदीवरील बरेजची पाहणी केली. यावेळी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट मोठे आहे. मात्र, या संकटाने खचून न जाता, शेतकऱ्यांनीतणावातून बाहेर यावे. शेतपिकांच्या नुकसानीपोटी जास्तीत जास्त मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे करताना कोणीही वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भोसले यांनी महापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.