Gram Panchayat Employee electrocution death
चाकूर : तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिसे (वय ३५) हे गावातील वीज दिवा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून बल्ब बसवत असताना अचानक विजेचा तीव्र शॉक बसून पोलावरून खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यकांत हा वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली चापोली ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून दोन वर्षांपासून कामावर रुजू होता. तो आज सकाळी ११ वाजता गावातील एका पोलवर बल्ब बसविण्यास चढला असता अचानक शॉक लागून तो पोलवरून खाली कोसळला. आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
या सूर्यकांतच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. १२ डिसेंबररोजी तो विवाहबंधनात अडकणार होता. त्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चापोली ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करून कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. सुर्यकांतच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.