लातूर : पुढारी वृत्तसेवा
येथील खोरी गल्लीत असलेल्या गरम मसाला या हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे 30 ते 35 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून एक तासाच्या अथक प्रयत्नाने या आगीवर अग्निशमन दलास नियंत्रण आणणे शक्य झाले. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
येथील खोरी गल्लीमध्ये घावटी यांची दोन मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यात हे हॉटेल आहे. सोमवारी सकाळी या हॉटेल मधून धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. काही कळते ना कळते तोच आग भडकली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी मिळून 20 अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर, साहित्य असे 35 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.