Farmers affected by heavy rains are in trouble again, snails are roaming the forests in Karepur mandal
विठ्ठल कटके
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: अतिवृतीमुळे खरीप पिकांवर आलेल्या आस्मानी संकटाला तोंड देत असतांनाच पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठ्या शंखी गोगलगायीचे संकट समोर उभे राहिले आहे. अतिपावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आता रब्बीच्या पीकांना मोठ्या शंखी गोगलगायीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारेपूर महसुल मंडळात व्हटी, सायगाव . खलंग्री व इतर गावांच्या परिसरात मोठ्या शंखी गोगलगायी रानोमाळ फिरतांना दिसत आहेत.
जुलै २०२२ मध्ये रेणापूर तालुक्यात पैसा (मिलीपीड) व लहान शंखी गोगलगायीमुळे सोयाबीन, कापूस, भाजीपाला व पूळबागांच्या ५१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाय योजनांचा अवलंब करावा. असा सल्ला रेणापूर तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिला होता. पावसाळा सुरु झाला की गोगलगायी व पैसा (मिलीपीड) नैसर्गीकरित्या हमखास दिसतात.
एकदा त्यांचा प्रादुर्भाव वाढला की त्यावर नियंत्रण करणे खर्चीक तर असतेच परंतु ते आवाक्याबाहेर जाते. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपायानुसार उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करणे हा प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे असते. जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी जमिनीवर येऊन कडक उन्हामुळे त्या नष्ट होतात. यावर्षी सततच पाऊस पडल्यामुळे जमिनीत सुप्त अवस्थेत असलेल्या मोठ्या शंखी गोगलगायी जमिनीवर आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
असा करा बंदोबस्त
बांधाच्या आतील बाजूने मेटाडीहाईड २.५ टक्के व सखेलकिल औषधीच्या गोळ्या बांधाच्या सात फुट अंतरावर टाकाव्यात, याला गोगलगाय आकर्षीत होऊन ती गोळीला चाटते त्यानंतर ती ४ ते ५ तासाने मरण पावते. रात्री शेतात गवताचे ठिग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी ठेवावा. सकाळी त्या जमा करुन साबन किंवा मिठाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात असे कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी सांगितले.
विषारी चुरमुरे टाकू नका
गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांही शेतकरी विषारी औषध चोळलेले चुरमुरे शेतात टाकुन गोगालगायीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र विषारी चुरमुरे खाल्याने पशु - पक्षी दगावण्याचा धोका असतो. त्यासाठी शेतकर्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. असा सल्ला तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे व कृषी पर्यवेक्षक गंगाधर कराड यांनी दिला आहे.