Ahmedpur Panchayat Samiti cowshed approval bribe
अहमदपूर : शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. अहमदपूर पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचारामुळे खळबळ उडाली आहे. गायगोठा मंजुरीसाठी तब्बल १२ हजार रुपये दिल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयासमोरच संतप्त भूमिका घेतल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.
तालुक्यातील येस्तार येथील शेतकरी महादेव संभाजी ढाकणे यांनी मनरेगा योजनेअंतर्गत गायगोठा मंजुरीसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र मंजुरी मिळवून देण्यासाठी विविध टप्प्यांवर पैसे मागण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ढाकणे यांनी केलेल्या आरोपानुसार, सुरुवातीला प्रस्ताव मंजुरीसाठी ५ हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर इतर प्रक्रियांसाठी आणखी ७ हजार रुपये देण्यात आले. अशा प्रकारे एकूण १२ हजार रुपये खर्च करूनही दोन वर्षांनंतरही गायगोठ्याला मंजुरी मिळाली नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयासमोरच आपल्याला कोणकोणत्या टप्प्यावर पैसे द्यावे लागले आणि कोणाला किती रक्कम दिली, याचा खुलासा करत प्रशासनाविरोधात आवाज उठवला. या प्रकारामुळे पंचायत समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणात पंचायत समिती प्रशासन आणि पदाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.