लातूर : जिल्ह्यात गेल्या महिन्यात आरक्षणाच्या कारणावरून झालेल्या आत्महत्यांच्या तीन प्रकरणांमध्ये धक्कादायक वळण आले आहे. पोलिस तपासात ही आत्महत्या आरक्षणासाठी झालेली नसून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या (सुसाईड नोट्स) बनावट असल्याचे उघड झाले आहे. शासकीय मोबदला मिळवण्यासाठी हा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मंगळवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत दिली.
तीन संशयास्पद प्रकरणांचा तपास
२६ ऑगस्ट २०२५ रोजी बळीराम श्रीपती मुळे (३६, रा. शिंदगी, ता. अहमदपूर) यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकाने पोलिसांना एक चिठ्ठी दिली होती, ज्यात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मजकूर लिहिल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (३२, रा. दादगी, ता. निलंगा) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मरणोत्तर पंचनाम्यात कोणतीही चिठ्ठी सापडली नव्हती, मात्र नंतर घरातील शर्टच्या खिशातून मिळालेल्या चिठ्ठीत “महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही” असा उल्लेख होता.
१४ सप्टेंबर रोजी अनिल बळीराम राठोड (२७, रा. हणमंतवाडी तांडा, ता. चाकूर) याचा देखील विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्याच्या बाबतीतही एका व्यक्तीने “बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केली” अशी चिठ्ठी पोलिसांना दिली होती.
हस्ताक्षर चाचणीत उघडकीस आली खरी गोष्ट
तीन्ही प्रकरणांत अहमदपूर, निलंगा आणि चाकूर पोलीस ठाण्यांत स्वतंत्रपणे गुन्ह्यांची नोंद झाली होती. तपासादरम्यान मृतकांच्या नैसर्गिक हस्ताक्षरांची तुलना संबंधित चिठ्ठ्यांशी करण्यात आली असता, हस्ताक्षरे जुळत नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर चाकूर प्रकरणातील हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यातून चिठ्ठ्या लिहिणारे संशयित ओळखले गेले. पंचासमक्ष त्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने घेऊन तुलना केली असता ती चिठ्ठ्यांशी जुळल्याचे दिसून आले.
ही सर्व कागदपत्रे लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आली. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तीनही प्रकरणांतील चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षरे संशयितांच्या हस्ताक्षरांशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले.
पाच जणांवर गुन्हे दाखल
या निष्कर्षानंतर पोलिसांनी संभाजी ऊर्फ धनाजी भिवाजी मुळे, माधव रामराव पिटले, शिवाजी फत्तू जाधव, नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड आणि तानाजी मधुकर जाधव या पाच जणांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपस्थित होते.