मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ लातूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नितेश राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारुन त्याचे दहन करण्यात आले. रविवारी (दि.11) सकाळी दहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी नितेश राणे यांचा प्रतिमात्मक पुतळा सार्वजनिक शौचालयाजवळ नेला आणि तिथे त्याला जोडे मारुन पेटवून दिले.
यावेळी आंदोलकांनी नितेश राणे व खासदार नारायण राणे तसेच राज्य सरकार विरोधात व मराठा आरक्षण समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. फडणवीसांनी पाळलेली ही पिलावळ असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आराध्य दैवत असून त्यांच्याबद्दलची अवमानकारक भाषा खपवून घेतली जाणार नाही. राणे पिता- पुत्रांनी स्वतात सुधारणा करावी अन्यथा त्यांना फिरणे मुश्किल करु असा इशारा यावेळी देण्यात आला.