भूम ( लातूर) : तुळजापूर येथील दसरा उत्सवानंतर देवीला निद्रिस्त करण्यासाठी नगर जिल्ह्यातील भिंगार येथून निघणारा मानाचा पलंग सोमवारी (दि.30 सप्टेंबर) भूम शहरातून भव्य स्वागत सोहळ्यातून मार्गस्थ झाला. या वेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
नगर जिल्ह्यातील भिंगार येथून निघालेला हा मानाचा पलंग परंपरेनुसार दसऱ्यानंतर तुळजापूरकडे जातो. बुधवार (दि.1) आज दुपारी पलंग खर्डा, उळूपमार्गे भूम शहरात दाखल झाला. प्रारंभी कसबा येथील देवीचे मंदिर व देशमुख वाड्यासमोर तो थांबला. त्यानंतर पेठ विभागातील गांधी चौक, निराळे खूंट व सगरे यांच्या वाड्यासमोर पलंगाचे विसाव्याचे ठिकाण झाले. यावेळी भाविकांनी दर्शन घेतले तर पलंगासोबत आलेल्या भक्तांना जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, भूम शहरासह ग्रामीण भागातील भक्तांनी सकाळपासूनच या मानाच्या पलंगाच्या दर्शनासाठी मोठी आतुरता दाखवली. त्यानंतर पलंग अरसोली, देवळाली, बार्शीमार्गे तुळजापूरकडे मार्गस्थ झाला. या मानाच्या पलंगाचे तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर सिमोलंघन होऊन दसरा साजरा केला जातो. याच पलंगावर तुळजाभवानी देवीला निद्रिस्त केले जाते. त्यामुळे भिंगार येथून येणाऱ्या या मानाच्या पलंगाचे धार्मिक आणि पारंपरिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.