Dhiraj Deshmukh : मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवा File Photo
लातूर

Dhiraj Deshmukh : मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवा

माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

Drought in Marathwada; Experiment with artificial rain immediately

लातूर, पुढारी वृतसेवा : पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठवाड्यात तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा, अशी आग्रही मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

धीरज देशमुख यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. अनेक भागांत पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. "कृत्रिम पावसाचा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबाबत निश्चितता नसली तरी संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, हा विश्वास बळीराजाला देणे गरजेचे आहे," असे धीरज देशमुख यांनी म्हटले आहे.

पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल, त्या ठिकाणी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येऊ शकतो. त्यामुळे पिकांना आवश्यक असलेला पाऊस मिळवून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान काही प्रमाणात टाळण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत असून पावसाची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृत्रिम पावसाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि आवश्यक त्या ठिकाणी हा प्रयोग युद्धपातळीवर राबवावा, असे आवाहन धीरज देशमुख यांनी केले आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT