अहमदपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी, भटक्या, अल्पसंख्याक, दलित समाजानी एकसंघ होऊन महाराष्ट्रात ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणे ही काळाची गरज असून यासाठी ओबीसींचे मराठा उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन ओबीसी योध्दे प्रा.लक्ष्मण हाके यांनी अहमदपूर येथील ओबीसी, अल्पसंख्याक, दलित महाएल्गार मेळाव्यात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ओबीसी, अल्पसंख्याक, दलित महाएल्गार मेळ्याव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीचा एकच उमेदवार निवडणुकीत उभा करून निवडून आणावा. ओबीसी मतदारांनी कोणत्याही मराठा उमेदवारांला मतदान न करता ओबीसीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. आज महाराष्ट्रात ओबीसी बहुसंख्य असतानादेखील सर्व सत्ता केंद्र मराठा समाजाच्या हाती आहेत. ओबीसी समाजानी मराठा समाजाची गुलामगिरी सोडून ओबीसीचे स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याचे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.
यावेळी नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांचा खरपूस समाचार घेतला. मेळाव्यास माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश हाके, डॉ. अशोक सांगवीकर, एन. आर. पाटील, भारत रेड्डी कलीमोदीन अहमद यांच्यासह अनेक मान्यवर तसेच अहमदपूर व चाकूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने ओबीसी अल्पसंख्याक व दलित समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक. अफिफा पठाण यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार गोविंद गिरी यांनी मानले.