लातूर नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या, मुरुडमधील नुकसानीची देशमुखांनी केली पाहणी  pudhari photo
लातूर

नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या, मुरुडमधील नुकसानीची देशमुखांनी केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : मुरुड व मुरुड महसूल मंडळात ढगफुटीसरश पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानुकसानग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत द्या अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केली. आ. देशमुख यांनी नकसानग्रस्त गावांची गुरुवारी पाहणी केली. पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने श्री दत्त मंदिरात स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची, नुकसानग्रस्त शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत त्यांच्याशी संवाद झाला.

मंगळवारी रात्री अवघ्या चार तासात १०९ मिलीलिटर पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या काढणीला आलेल्या आणि काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शिवाय, व्यापारी, दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने ३०० हुन अधिक नागरिकांना श्री दत्त मंदिरात स्थलांतरित करावे लागले. या सर्व परिस्थितीची पाहणी आमदार देशमुख यांनी केली.

स्थलांतरित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचेही यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, मंडळ कृषी अधिकारी योगेश मुळजे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, तलाठी कमलाकर आरडले आदींसह काँग्रेस व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुरुड आणि महसूल मंडळात हातातोंडाशी आलेले सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन बाहुन गेले आहे.

नदी नाल्यालगतच्या पिक व जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे. शहरातील अण्णा भाऊ साठे चौक येथील दुकानात पाणी शिरून नुकसान झालेल्या किराना, कापड, फुटवेअर, फर्निचर आदी ४० हून अधिक दुकानांची पाहणी केली. या नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना एनडीआरएफ निकषांप्रमाणे सरकारने मदत द्यावी, अशी मागणी आमदार धिरज देशमुख यांनी केली.

आ. देशमुखांच्या सूचना

पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने प्रशासनाने दक्ष रहावे. पुन्हा पूरस्थिती उद्भवणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना एनडीआरएफ निकषांप्रमाणे मदत द्यावी. सर्व नुकसानीचा दिवसभरात पंचनामा करून शासनाला तत्काळ अहवाल सादर करावा, पौकविमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद ऑनलाईन व ऑफलाईन घेण्यात यावी. मागील वर्षीचाही विमा येथील शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीला सक्त ताकीद द्यावी. पूरस्थितीमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा येथे धोका आहे.

त्यामुळे आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन तपासणी शिबीर घ्यावे, अशा सूचना आ. धीरज देशमुख यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT