Nilanga Taluka Crop Inspection
लातूर : पावसाने पाठ फिरवल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक वाळून गेले आहे. डोळ्यांदेखत उभे पीक करपल्याने वर्षभराच्या कष्टावर पाणी फेरले गेले. या व्यथेचा बांध बुधवारी (दि.२३) निलंगा तालुक्यातील जावू शिवारात फुटला. वाळलेल्या सोयाबीनच्या धाटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
‘आमच्यावर आभाळ फाटलंय साहेब... साल कसं काढायचं, गुरं-ढोरं कशी जगवायची? तुम्हीच आमचा आधार आहात, आम्हाला आधार द्या,’ अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जावू शिवारात थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी वाळलेल्या सोयाबीनची स्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली.
शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून फडणवीस यांनी त्यांना धीर दिला. या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून, लातूर जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार बसवराज पाटील, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार धीरज देशमुख, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आदी उपस्थित होते.
विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळाची परिस्थिती शासनाने गांभीर्याने घेतली असून, दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनाला प्राप्त झाले असून, आवश्यक उपाययोजनांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासनाकडून केली जात असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.