Democracy is at risk if scientific approach is lost
लातूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांमध्ये श्रध्दांची, धर्माची, कुप्रथांची, तसेच चुकीच्या परंपरांची पकड घट्ट होत चालली आहे. ती फेकून दिली पाहिजे. लोकशाहीमध्ये अंतिमतः कोणी अवतार धारण करीत नसतो तर आपण सर्व लोकच आपले भविष्य बदलत असतो. यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाणवला पाहिजे. आपल्या राज्य घटनेनेच तो मुलभूत हक्क मानला आहे. हा विवेकशील विचार असून तो हरवून चालणार नाही. तो हरवला तर लोकशाहीला धोका आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार व माध्यमतज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांचा बाबा आमटे राष्ट्रीय कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल लातूर येथे त्यांचा प्रा. डोळे यांच्या हस्ते नागरी सत्कार झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले गेल्या दहा वर्षात धर्मसत्ता आणि राज्यसत्ता कधी नव्हे इतकी एकत्र आली आहे. फार पूर्वी आपण वाचत असू की क्षत्रिय राजा राज्य करायचा, तेव्हा त्याचा सल्लागार ब्राह्मण असायचा. इतर वर्णांना काही महत्व नसायचे. आज क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोन वर्ग राज्य करायला सरसावले आहेत; आणि त्यांनीच सगळे राज्य हातात घेतले असल्याचे दिसत आहे. धर्माचा इतका भडिमार गेल्या दहा वर्षात जितका झालाय की पूर्वीच्या कितीतरी वर्षात इतका कधीच झाला नव्हता. माधव बावगे यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतः ला झोकून दिले आहे.
त्यांचे कार्य प्रेरणादायी असून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी असण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. डोळे म्हणाले. उपस्थित पाहुण्यापैकी महापौर जयश्री सोनकांबळे, बी. बी. ठोंबरे, भारत जोडो युवक अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्षसंजय बनसोडे, सौंदाळाचे सरपंच शरद आरगडे यांनी आपले विचार व्यक्त केले. पुरोगामी विचाराची कास धरण्याची आवाहन सर्व वक्त्यांनी यावेळी केले. यावेळी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. राम बरुरे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती माधव वावगे यांनी हा सन्मान माझा नसून विचारांचा असल्याचे नमुद करीत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकशील समाज घडविण्याचा लढा अजून अपूर्ण असल्याचे सांगितले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी माधव बावगे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांचे कार्य समाजासाठी विशेषतः तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे, असे सांगितले.
प्रास्ताविक प्रा. सुभाष भिंगे यांनी केले. सृष्टी शृंगारे या विद्यार्थीनीने आम्ही प्रकाशबीजे हे प्रेरणागीत सादर केले. पाहण्यांचा परिचय ज्येष्ठ पत्रकार श्याम जैन यांनी करून दिला. सूत्रसंचालन भारती गोवंडे यांनी केले. प्रा. दशरथ भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप हम होंगे कामयाब या गिताने झाला.