Dangerous: An electric pole in the middle of the road
चाकूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वर्दळीच्या उजळंब रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला विद्युत खांब नागरिकांसाठी दिवसेंदिवस जीवघेणा ठरत असून, रस्त्यात विद्युत पोल की पोलातच रस्ता ? हे न उलगडणारे कोडे असून याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
चाकूर शहरातून उजळंबकडे जाणारा सार्वजनिक शौचालयाच्या वर्दळीच्या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. संबंधित विभागांच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध आला असून रास्ता होताना हा विद्युत खांब सदरील यंत्रणेस दिसला नसेल का, हा विद्युत खांब अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहे.
या धोकादायक खांबामुळे यापूर्वी अनेक दुचाकीस्वार, चारचाकी वाहने रात्री धडकून पलीकडच्या नालीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच एक ऑटो रिक्षा साईडच्या नालीत कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातात ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रवासी जखमी झाले होते. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, रस्ता सिमेंटीकरण व रुंदीकरण करताना रस्त्याच्या मध्यभागी असलेला विद्युत खांब हलवण्यात आला नाही.
त्यामुळे रस्ता आधी की विद्युत खांब आधी? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, महिला तसेच जड वाहतूक मोठ्या प्रमाणात ये-जा करते. रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, वेगाने येणारी वाहने आणि अचानक समोर येणारा विद्युत खांब अपघातास निमंत्रण देत आहे.
संबंधित यंत्रणांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या धोकादायक खांबाची तातडीने पाहणी करून तो हटवावा अथवा रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करावा, अन्यथा संभाव्य अपघातास जवाबदार कोण, असा थेट सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लवकरच खांब हटविणार : सूरज गोंड
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरज गोंड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी एमएसईबीच्या वरिष्ठ विभागाला पत्र पाठवून तो विद्युत खांब हटविणासाठी मंजुरी आणली आहे. त्याचे काम लवकरात लवकर होईल, असे सांगितले.