Cooperatives dominate Latur District Bank
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलने १९ पैकी १५ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले आहे. प्रत्यक्ष मतदान झालेल्या १५ पैकी ११ जागांवर विजय मिळविताना चार जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या गेल्या आहेत. दुसरीकडे, महायुतीच्या 'रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल'ला चार जागा मिळाल्या असून, यामुळे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे बँकेवरील वर्चस्व अबाधित राहिले आहे. तर विरोधकांनाही बँकेत प्रतिनिधित्व मिळाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. १६) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. रविवारी झालेल्या मतदानात ९९९ पैकी ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात एकूण ९९.४० टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती; ज्यामध्ये निलंगा, उदगीर, देवणी, जळकोट आणि चाकूर या तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान झाले होते. काँग्रेसप्रणीत सहकार पॅनल आणि महायुतीच्या परिवर्तन पॅनलमध्ये ही थेट व अटीतटीची लढत झाली.
या निवडणुकीत सहकार पॅनलचे धिरज देशमुख, जयेश माने, जगन्नाथ पाटील, चंद्रशेखर दंडीमे, प्रिती भोसले, आशिष राजूरकर, संतोष पाटील, हेमंत पाटील, शितल पाटील, गितांजली लांडगे आणि हाके शेषराव केशवराव हे प्रत्यक्ष मतदानातून विजयी झाले. तर सहकारचे अविनाश जाधव, शोभा अभिमन्यू पवार व अन्य दोघांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.
परिवर्तन पॅनलकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, आमदार रमेशअप्पा कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड, विवेक सिरसाठ आणि सर्जेराव मोरे यांनी विजय मिळविला. पतसंस्था मतदारसंघातून ऋषिकेश कराड यांनी अशोक गोविंदपूरकर यांचा, तर अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या काकी संगिता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. निकालानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
अंकुश ठेवणार : अरविंद पाटील निलंगेकर
जिल्हा बँकेत एकाधिकारशाही चालू देणार नाही. ठराविक व्यक्ती आणि संस्थांऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जवाटप व्हावे, यासाठी परिवर्तन पॅनलचे आम्ही संचालक कारभारावर अंकुश ठेवू, असे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.