लातूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये काँग्रेसने भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा धडाका सुरू केला आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यावतीने रविवारी (दि.१३) लातूरमध्ये एका ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होता. या सोहळ्याचा निषेध व्यक्त करत भाजप कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी धडकले. यावेळी काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केल्याने प्रचंड गदारोळ माजला. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी शहरात विविध भागांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन सोहळे सुरू केले आहेत. रविवारी (दि.१३) सायंकाळी शहरातील मजगेनगर भागात रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता. याच भागात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांच्या भूमिपूजन कार्यक्रमावर निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन एकमेकांना विकास कामांचा व मंजूर केलेल्या कामांचा जाब विचारत होते.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू असतानाच काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून भाषणाला सुरुवात केली. लातूरमध्ये सर्वधर्म समभावाचे वातावरण असताना भाजपकडून भीतीचे वातावरण तयार करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत लातूरची जनता न्यायनिवाडा करील, असेही आमदार देशमुख म्हणाले.