चाकूर : तालुक्यातील लातूर रोड परिसरात असलेल्या मतदान केंद्र परिसरात गैरकायद्याची मंडळी जमवून एका मतदारास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संग्राम बाबुराव पटने (वय ४०, व्यवसाय शेती, रा. लातूर रोड, ता. चाकूर) हे आपल्या चुलतीस मतदान केंद्र क्रमांक ९०९, ९१० व ९११ वर मतदान कसे करावे याबाबत समजावून सांगत असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला केला. यामधील एका आरोपीने फिर्यादीच्या अंगावर येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इतर आरोपींनीही संगनमताने मारहाण करत शिवीगाळ केली व पुन्हा येथे आलास तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आठ आरोपीविरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश मरपल्ले हे करीत आहे.