चाकूर : तालुक्यातील वडवळ ना.येथील सटवाई नगर भागात साचलेल्या पाण्यासाठी ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला शनिवारी सकाळी कुलूप लावले.
वडवळ येथील ग्रामस्थांनी गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना निवेदन देवून सटवाईनगरचे पाणी काढून द्या, अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. परंतु या मागणीवर कसलीच कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या समस्या संदर्भात यापूर्वी नागरिकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही तात्पुरते काम केले होते. आज परत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी थांबले आहे. पहिलेच पाणी निघाले नसल्याने परत पावसाचे पाणी थांबले आहे. यामुळे सटवाईनगर भागातील नागरिकांनी अखेर संतप्त होवून आज तीव्र आंदोलन करून सटवाईनगर भागातील साचलेल्या पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी अशी मागणी केली.
यावेळी विद्यमान उपसरपंच बालाजी गंदगे, राजकुमार बेंडके,उमाकांत सुवर्णकार,बाबू भेटे,आशिष चौधरी,काशिनाथ मिरकिले,माजी सरपंच भगवान लोखंडे आदिसह वडवळ येथील सटवाई भागातील नागरिक उपस्थित होते.